नवी दिल्ली - दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळावा, अशी मागणी निर्भयाच्या आईने केली आहे. पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या निर्भयावर २०१२ मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये अमानुष सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. मुकेश, पवन, विनय, अक्षय अशी या चौघा गुन्हेगारांची नावे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने या घटनेतील ४ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापैकी विनय वर्मा याने राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल केला आहे. निर्भयाच्या आईने राष्ट्रपतींना या गुन्हेगारांचा दया अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे. 'या घटनेला ७ वर्षे झाली. या घटनेचा धक्का, दुःख आणि क्लेश असह्य आहेत. त्यातच न्याय मिळण्यास विलंब लागत आहे,' असे पत्र त्यांनी स्वतःच्या वकिलामार्फत पाठवले आहे.
दिल्लीच्या न्यायालयाने नुकतेच तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना या घटनेतील चार दोषींना त्यांच्या दया अर्जांविषयी अद्ययावत माहिती घेण्यासाठी १३ डिसेंबरला न्यायालयासमोर हजर करण्यास सांगितले होते.
न्यायालयात पीडित मुलीच्या पालकांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यांनी तुरूंगातील अधिकाऱ्यांना दोषींना फाशी देण्याची कार्यवाही लवकर करावी यासाठी दिशानिर्देश करण्याची मागणी केली होती.
दोषींनी सुटकेच्या सर्व मार्गांचा अवलंब करून झाल्यानंतर पीडित निर्भयाच्या पालकांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात निर्भयाच्या पालकांनी या चारही दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी जलदगती न्यायालयात धाव घेतली होती. १२ डिसेंबर २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला या चार दोषींना तत्काळ फाशी देण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका काढून टाकली होती.
या अमानुष सामूहिक बलात्कार प्रकरणात अत्यंत भयानकरीत्या जखमी झालेल्या २३ वर्षीय पीडितेचा 29 डिसेंबर २०१२ ला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात मृत्यू झाला होता. तिला वैद्यकीय उपचारांसाठी तेथे हलवण्यात आले होते.