नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्लीतील पटीयाला हाऊस कोर्टाची सुनावणी झालेली आहे. सुनावणीत न्यायालयाने चारही आरोपीं विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाणार आहे.
निर्भया प्रकरणी निकाल २०१८ पासून प्रलंबित असून आरोपी खटला लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आता दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेत निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. त्यानुसार आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फासावर लटकवले जाणार आहे. त्याचबरोबर, आरोपींना १४ जानेवरी पर्यंत न्यायीक उपायांचा वापर करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. दरम्यान, निर्भया प्रकरणातील आरोपींचा न्यायालयात पक्ष मांडणारे वकील ए.पी. सिंह यांनी दिल्ली न्यायालयाच्या निर्वाळ्या विरुद्ध सर्वोच्छ न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
निकालावर नागरिकांच्या प्रक्रिया
या निर्णयामुळे देशातील महिलांना हिम्मत मिळेल- आशा देवी
निर्भयाची आई आशा देवी यानी दिल्ली न्यायालयाच्या निकालांवर समाधान व्यक्त केले आहे. माझा मुलीला न्याय मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशातील महिलांना हिम्मत मिळेल आणि त्यांचे न्यायिक प्रक्रियेवर विश्वास टिकून राहील, अशी भावना निर्भयाची आई आशा देवी यांनी व्यक्त केली.
शिक्षा द्यायला न्यायव्यवस्थेला ७ वर्षे का लागली ?- स्वाती मालीवाल
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीसुद्धा न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. हा विजय देशातील सगळ्याच निर्भयांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आरोपींना शिक्षा द्यायला न्यायव्यवस्थेला ७ वर्षे का लागली ? हा वेळ कमी करता येणार नाही का ? असा सवाल स्वाती मालीवाल यांनी केला.