नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये पवनने कनिष्ठ न्यायलयाच्या निर्णयाला आव्हान दिले असून साक्षीदारांच्या विश्वसनियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
यापूर्वी पवन गुप्ताने पोलिसांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल केली होती. आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका त्याने दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने याप्रकरणी बुधवारी मंडोली तुरुंग प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
दरम्यान, निर्भया प्रकरणी पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि मुकेश कुमार या चौघांना २० मार्चला पहाटे ५.३० वाजता फाशी होणार आहे.
डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : पोलिसांविरूद्ध गुन्हा दाखल करा, दोषी पवन गुप्ताची मागणी..