मुंबई - निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केले. यानंतर वाद निर्माण झाल्यावर विरोधी पक्षांनी त्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर आजपासून (सोमवार) चौधरी या आठवडाभर रजेवर गेल्या आहेत. दरम्यान त्या सुट्टीवर असतानाच त्यांची महापालिकेतून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. परंतु, चौधरी यांची करण्यात आलेली बदली म्हणजे त्यांना बढती दिल्याचा प्रकार आहे, अशी चर्चा सध्या महापालिका मुख्यालयात सुरू आहे.
निधी चौधरी यांच्या पालिकेच्या कार्यालयात संपर्क साधला असता त्या आजपासून एका आठवड्याच्या सुट्ट्टीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. सुट्टीवर गेल्या असतानाच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी त्यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात उपसचिव या पदावर बदली करण्यात आली आहे. यामुळे वादग्रस्त ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सोडून बढती दिली जात आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे प्रकरण?
१७ मे रोजी निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे. जे रस्ते आणि संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकण्यात आले पाहिजे. जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत. तसेच नोटांवरुनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच खरी श्रद्धांजली ठरेल. ३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचे छायाचित्र त्यासोबत शेअर केले होते.
सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचे पाहून निधी चौधरी यांनी ते ट्वीट डिलीट केले आहे. त्यानंतर, सारवासारव करत आपण गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही असे चौधरी यांनी ट्वीट केले.