श्रीनगर : इस्लामिक स्टेट खोरासन प्रोव्हिन्स (आयएसकेपी) या दशहतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली.
या पाच जणांमध्ये काश्मीरच्या एका महिलेचाही समावेश असल्याचे एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दिल्लीचा रहिवासी जहांझैब समी, काश्मीरची हीना बशीर, हैदराबादचा रहिवासी असलेला अब्दुल्ला बसिथ यांच्यासोबत पुण्याचे सदिया शेख आणि नबील सिद्दीक खत्री यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांवर इसिस/आयएसकेपी या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेची विविध कलमे आणि यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांमधील समी आणि त्याची पत्नी हीना यांना दिल्ली पोलिसांनी यावर्षी मार्चमध्ये अटक केली होती. आयएस संघटनेच्या 'सौत अल-हिंद' या बंदी घालण्यात आलेल्या नियतकालिकाची छपाई करताना ते पकडले गेले होते. तसेच समी, हीना, बसीथ आणि सिद्दीक हे सर्व आयईडी बॉम्ब बनवण्याच्या तयारीतही होते असे या आरोपपत्रात म्हटले आहे.