मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना एनआयए न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. या संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह सध्या भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहे. मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयांनी साध्वीच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. साध्वीला निवडणूक लढविण्यास परवानगी देऊ नये तसेच तिचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
मालेगाव स्फोटात आरोपी असलेल्या व सध्या जामीनावर असलेल्या साध्वीला भाजपने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत. साध्वीच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.
दरम्यान, दाखल याचिकेवर मंगळवारी साध्वीने उत्तर देताना म्हटले आहे की, निवडणुकीत माझ्या उमेदवारीच्या विरोधात आलेली याचिका हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. एनआयए न्यायालयात माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करत याचिककर्त्याला आर्थिक दंड आकारण्यात यावा, अशा प्रकारचे उत्तर साध्वी यांच्या वकिलांकडून मंगळवारी एनआयए कोर्टात देण्यात आले होते. या बरोबरच एनआयए तपास यंत्रणेकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना साध्वीने जामिनावर सुटल्यानंतर निवडणूक लढवावी किंवा नाही हा प्रश्न आमचा नसून निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेऊ शकतो, असे म्हणत आपली बाजू मांडली होती.
या अगोदर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे, की जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी लखनौ येथील रुग्णालयात स्तनांच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. न्यायालयाने तिला जामीन देताना अटीशर्तीं सोबत, तिच्या स्तनांच्या कर्करोगाच्या आजाराला धरून जामीन मंजूर केला होता. तिच्यावर अद्याप गुन्हा सिद्ध झाला नसून साध्वीवरील मकोका कलम हटवण्यात आले आहे. कुठलाही गुन्हा सिद्ध न झाल्याने आपण निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचेही साध्वीने तिच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सय्यद निसार यांच्या याचिकेवर साध्वी प्रज्ञा सिंग आणि एनआयए तपास यंत्रणेने सादर केलेल्या उत्तरावर कोर्टाने याचिका फेटाळून लावली.