नोएडा (नवी दिल्ली) - सेक्टर-19 पोलीस चौकीचे प्रभारी सौरभ शर्मा यांना किराणा साहित्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांवर लाठीचार्ज केल्यावरून निलंबित करण्यात आले आहे. शर्मा यांनी महिलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. यानंतर गौतमबुद्धनगर येथील पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत निरीक्षक शर्मा यांना निलंबित केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावरून उत्तर प्रदेशातील पोलिसांकडे आणि गौतमबुद्धनगर येथील आयुक्तांकडे संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
पोलीस आयुक्तांनी केले निलंबित
नोएडाच्या सेक्टर-19 मध्ये महिला किराणा साहित्यासाठी रांगेत उभ्या होत्या. त्यांच्यावर येथील पोलीस ठाणे प्रभारी शर्मा यांनी लाठीचार्ज केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर लोकांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर ट्विटरवरून हल्लाबोल केला होता आणि संबंधित पोलिसांवर कडक कारवाईची मागणीही केली होती. यानंतर पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेत शर्मा यांना निलंबित केले.
सर्व पोलिसांनी धैर्याने काम करावे
अतिरिक्त पोलीस उपायुक्त रणविजय सिंह यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलांना होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओची पडताळणी केल्यानंतर तो खरा असल्याचे समोर आले. यानंतर संबंधित पोलिस कर्मचार्याला निलंबित केले गेले. यासह सिंह यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना धीराने काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये लोकांना सोबत घेऊन काम करावे, असेही सांगितले आहे.