नवी दिल्ली - भारतामध्ये नव्या कोरोना विषाणूचे २५ रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवा विषाणू सापडला असून त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे भीत पसरली आहे. २५ पैकी २० जण म्युटेट स्ट्रेनचे बाधित असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना केंद्राच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांची चाचणी -
ब्रिटनहून भारतात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाकडून मिळवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचाही शोध सुरू आहे. नववर्षाच्या पाश्वभूमीवर अनेक राज्यांनी मोठ्या शहरांत कर्फ्यू लागू केला आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण डेनमार्क, नेदलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, स्पेन, स्वित्झलँड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूर या देशांतही आढळून आले आहेत. नोव्हेंबर २५ ते डिसेंबर २३ पर्यंत भारतात ब्रिटनहून सुमारे ३३ हजार प्रवासी आले आहेत. या सर्वांची चाचणी करण्यात येत आहे. मात्र, यातील अनेक प्रवाशांचा ठावठिकाणा लागत नाही.
पाटण्यातील ७१ प्रवाशी बेपत्ता
इंग्लडहून बिहारमधील पाटणा येथे परतलेल्या ७१ प्रवासांचा ठावठिकाणा लागत नसल्याने स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली आहे. एकून ९६ प्रवासी मागील काही दिवसांपूर्वी ब्रिटनहून पाटण्यात आले आहेत. मात्र, त्यातील ७१ जणांचा पत्ता लागत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, हे प्रवासी घरी सापडले नाहीत. ब्रिटनमध्ये कोरोना नवा विषाणू सापडल्यानंतर भारताने विमान सेवा बंद केली आहे.