नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना संसर्ग झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतामध्ये २७५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळपासून २७ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे. लडाख ३, महाराष्ट्र ११, कर्नाटक १, पश्चिम बंगाल १, दिल्ली/नोयडा १, हरियाणात १ रुग्ण आढळून आला आहे.
कोरोनाचा जास्त प्रसार झालेल्या राज्यांनी सतर्कतेचा उपाय म्हणून शहरे बंद ठेवली आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने एकातंवासात राहणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. १४ दिवस घरातच राहण्याचे संशयितांना सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर शहर कोरोनाच्या जास्त प्रसारामुळे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंडिगोचे देशातील केवळ ६० टक्के विमान उड्डाणे रविवारी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युची रविवारी घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिगोने विमान उड्डाणांची संख्या कमी केली आहे.जनता कर्फ्युचे रविवारी सकाळी सात ते रात्री ९ वाजेपर्यंत पालन करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. जगभरात विमान प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहे. बहुतांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केल्याचे इंडिगोने म्हटले आहे.
देशभरामध्ये कोरोना संशयितांची संख्याही वाढत आहेत. तपासणी लॅबची संख्याही वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.