नवी दिल्ली - देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे केंद्र सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे सर्वोच्च नागरी पुरस्काराची निर्मिती केली आहे. या पुरस्कारामध्ये एक पदक आणि प्रशस्तिपत्रक असेल. पुरस्काराची घोषणा सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिनी केली जाणार आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
![sardar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4557615_ppd.jpg)
या पुरस्काराबरोबर रोख रक्कम दिली जाणार नाही, तसेच एका वर्षात तीनपेक्षा जास्त पुरस्कार दिले जाणार नाहीत. विशेष परिस्थिती सोडता हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला मरणोत्तर दिला जाणार नाही. पुरस्कार सुरू करण्याबाबत गृहमंत्रालयाने आधीच अधिसूचना जाहीर केली होती. पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कराचे वितरण केले जाणार आहे.
पुरस्कारासाठी नावे निवडण्यासाठी पंतप्रधान आधी एक समिती स्थापन करतील. त्यामध्ये मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, राष्ट्रपतींचे सचिव, गृह सचिव आणि इतर सदस्य असतील. याबरोबरच पंतप्रधानांनी निवड केलेले इतर सदस्यही असतील. कोणतीही व्यक्ती या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज भरु शकते, तसेच कोणतीही सरकारी संस्था नाम निर्देशन करू शकते.