गुवाहाटी – ईशान्य भारतातही कोरोनाने थैमान माजवायला सुरुवात केली आहे. आसाममध्ये एकाच दिवशी 936 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. ही माहिती आसामचे आरोग्य मंत्री हिंमत विश्व शर्मा यांनी दिली.
आसामची राजधानी गुवाहाटीत कोरोनाचे नवे 521 रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाचे एकूण 15 हजार 536 रुग्ण आहेत. त्यामधील 9 हजार 848 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 हजार 650 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 35 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे ब्रम्हपुत्रेला पूर आल्याने राज्यातील 25 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. आसामला एकाचवेळी महामारी आणि महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 8 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर एकाच दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 27,114 आहे. एकाच दिवसात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.