पिथोरागड - नेपाळच्या संसदेने या आठवड्यात भारताच्या हद्दीतील तीन महत्त्वाचे प्रदेश नेपाळच्या नकाशात समाविष्ट करण्याची घटनादुरुस्ती केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सीमावाद सुरू झाला आहे. दरम्यान, भारतीय सीमेपासून जवळ असलेल्या नेपाळमधील रेडिओ केंद्रांनी या भागांबाबत भारत विरोधी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे, असे सीमेवर राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सांगितले आहे.
भारतीय हद्दीतील लिपूलेक, लिंपियाधूरा आणि कालापाणी हे भूप्रदेश भारतीय हद्दीत असून रणनितीकदृष्या भारतासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, नेपाळने या प्रदेशांवर दावा सांगितला आहे. कृत्रिरिमरित्या सीमा वाढविण्याचा नेपाळचा दावा कधीही मान्य करण्यात येणार नाही, असे वक्तव्य भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. दोन दिवसांपूर्वी नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी या भागाचा दौराही केला.
काही नेपाळी एफएम रेडिओ वाहिन्यांनी भारतीविरोधी भाषणे प्रसारीत करण्यास सुरुवात केली आहे, असे सीमेवरील दारचुला भागातील दांतु गावात राहणाऱ्या शालू दाताल यांनी सांगितले. सीमेवरील दोन्हीकडचे नागरिक नेपाळी गाणे ऐकतात. मात्र, गाण्यांच्या मध्यावधीत नेपाळी नेत्यांची भारत विरोधी भाषणे लावण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.
नेपाळमधील महत्त्वाची रेडिओ स्टेशन ‘नया नेपाळ’ आणि ‘कालापाणी रेडिओ’ केंद्रांवर ही भाषणे ऐकायला मिळत असल्याचे दाताल यांनी सांगितले. काही जुने रेडिओ स्टेशन जसे की, ‘मल्लिकार्जुन रेडिओ’ आणि 'अन्नपूर्णा ऑनलाईन वेबसाईट कालापाणी नेपाळचा भाग असल्याचे पसरवत असल्याचे दाताल म्हणाले.
अनेक नेपाळी रेडिओ स्टेशन नेपाळमधील दारचुल भागात असल्यामुळे त्यांची रेंज भारतातील बालुआकोट, जुलीजीबी, आणि कालिका या भागांमध्ये येते. यातील काही रेडिओ स्टेशनने कालापाणी, लिंपियाधूरा आणि लिपूलेक या परिसरातली हवामानाची माहिती देण्यासही सुरुवात केली आहे, असे दाराचुल येथील एका स्थानिक नेत्याने सांगितले.
गुप्तचर विभागाकडून आम्हाला याबाबत काही माहिती मिळाली नसल्याचे पिथोरागाड येथील पोलीस अधिक्षक प्रीती प्रियदर्शनी यांनी सांगितले.