मुंबई - माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे आज (गुरुवारी) निधन झाले. त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या.
सत्यनारायण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आज त्यांची प्राणज्योत मालवली. यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे पती तसेच मुलाला सेव्हन हिल्स रुग्णालयात तर मुलीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सत्यनारायण या 1972 च्या सनदी अधिकारी होत्या. त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होण्याचाही मान मिळवला होता. सत्यनारायण यांनी गृह विभागाच्या प्रधान सचिव म्हणून ही काम केले आहे. प्रशासकीय सेवेत तब्बल 37 त्यांनी काम केले आहे. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता.
यासोबतच साहित्यिक म्हणूनही एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्यांची 13 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लेखक म्हणूनही ओळख असलेल्या सत्यनारायण यांच्या कवितांच्या ध्वनिचित्रफीती ही प्रकाशित आहेत. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.