पाटणा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकाळात बिहारमध्ये जंगल राज ऐवजी जनता राज आले आहे. नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल आणि भाजप आघाडीचा राज्यात दोन तृतीयांश बहुमताने विजय होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या 'बिहार जनसंवाद रॅली'मध्ये आज अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलावर निशाणा साधला. आरजेडी सत्तेत असताना बिहारचा विकास दर फक्त 3.9 टक्के होता. मात्र, एनडीएच्या काळात बिहारचा विकास दर 11.3 टक्क्यांवर पोहचला आहे. बिहारमध्ये आता लँटर्न(कंदील) राज ऐवजी एलईडी राज आले आहे. आरजेडी पक्षाचे चिन्ह कंदील असून याद्वारे शहा यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली.
बिहारच्या मातीने जगाला लोकशाहीची माहित करून दिली. महान मगध साम्राज्याची स्थापना बिहारमध्ये झाली. बुद्ध, महावीर, चंद्रगुप्त, चाणक्य यांची बिहार भूमी आहे. या भूमीने कायम देशाला दिशा दाखवण्याचे काम केले. जेव्हा कधी लोकशाही हक्कांची पायमल्ली झाली, तेव्हा बिहारची जनता विरोधात उभी राहीली आणि विजयाच्या मार्गावर चालत राहीली.
बिहार जनसंवाद रॅलीचा राज्याच्या विधानसभा निवडणुकांशी काहीही नसून संबध आत्मनिर्भर भारत करण्यासाठी लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. भाजप अशा 75 सभा घेणार आहे. यावेळी अमित शाह यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशिल मोदी यांचे कौतुक केले. गाजावाजा न करता ते लोकांसाठी काम करत असल्याचे शाह म्हणाले.