नवी दिल्ली - राष्ट्रीय महिला आयोगाने बिहार आणि मिझोराम राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची दखल घेतली आहे. दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिला आयोगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावरून महिला आयोगाला टॅग करण्यात आल्यानंतर आयोगाने याप्रकरणी लक्ष घातले आहे.
बिहारमधील धक्कादायक घटना
बिहारमध्ये तीन महिलांना चेटकीन असल्याच्या संशयावरून नागरिकांनी बेदम मारहाण केली होती. नागरिकांनी महिलांना अर्धनग्न करून मारहाण केली, तसेच बळजबरीनं मलमूत्र प्यायाला लावले होते. राज्यातील मुज्जफरपूर येथील धकरामा येथे ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देशभरात पसरल्यानंतर खळबळ उडाली होती.
बिहारमध्ये जादुटोणा विरोधी कायदा असूनही अशा घटना समोर येत आहेत. त्यावरून महिला आयोगाने चिंता व्यक्त केली. तसेच बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आणि मुज्जफरपूरच्या पोलीस अधीक्षकांना तत्काळ कारावाई करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करण्यास महिला आयोगाने आदेश दिले आहेत.
लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रवेश नाकारला
मिझोराम राज्यात ओळखपत्र नसल्याने एका गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आला होता. राज्यातील तलाबुंग येथे ही घटना घडली होती. लॉकडाऊन असताना गर्भवती महिलेला रुग्णालयाने सेवा का नाकारली? असा सवाल आयोगाने विचारला आहे. निष्काळजीपणा केल्याचा आरोप आयोगाने अधिकाऱ्यांवर ठेवला आहे. याप्रकरणी कारवाई करून अवहाल सादर करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.