रायपूर - छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये एका नक्षली जोडप्याने शनिवारी आत्मसमर्पण केले. या दोघांवर एकत्रितपणे १३ लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गैंदसिंह कोवाची (३५) आणि त्याची पत्नी रामशीला धुर्वे (२२) अशी या दोघांची नावे आहेत. माओवादी विचारसरणी ही पोकळ आहे हे समजल्यामुळे, तसेच वरिष्ठांकडून आदिवासींचे होत असलेले शोषण पाहून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोवाची हे २००६ साली नक्षली चळवळीत सामील झाला होता. सध्या तो मोहला-औंधी भागाचा सचिव म्हणून पाहत होता. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील पोलीस ठाण्यामध्ये खून, लुटमार आणि दरोड्याचे साधारणपणे ३६ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते. तसेच, विभाग समिती आणि झोनल वैद्यकीय पथकाची सदस्य असलेल्या रामशीलावर पाच लाखांचे बक्षीस होते. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये जखमी झालेल्या नक्षल्यांवर ती उपचार करत होती.
त्यांना नवआयुष्य सुरू करण्यासाठी प्रोत्साहनपर प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच, सरकारच्या योजनेनुसार आवश्यक ती मदतही देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : दिल्ली हिंसाचार : अंकित शर्मा हत्याकांड प्रकरणी आणखी ५ जण अटकेत