मुरादाबाद - उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील प्रचारसभेमध्ये पंजाब सरकारचे मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नंबरचे फेकू आणि खोटारडे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी 'डासाला कपडे घालणे, हत्तीला मांडीवर खेळवणे आणि मोदींना खरे बोलायला लावणे सारखेच अशक्य आहे,' अशी खोचक टीका सिद्धू यांनी केली आहे.
मोदींवर लवकरच 'फेकू नंबर वन, झूठा नंबर वन' हा सिनेमा येत आहे, असे ते म्हणाले. 'एकीकडे करोडोंच्या गप्पा मारणारे मोदी पकोडे तळण्याचा धंदा आणि फरार व्यक्तींची संगत' अशी मोदींची अवस्था आहे, अशी टीका त्यांनी केली. ‘काहे का तू चौकीदार है, पूरे देश में हाहाकार है’, ‘पुरे ब्रम्हांड मे शोर है, चौकीदार चोर है’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. 'अब की बार मोदी, बस कर यार, असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला.
ते स्थानिक उमेदवार इम्रान प्रतापगढी यांच्या प्रचारासाठी आले होते. 'मी माझी पगडी तुमच्यासमोर ठेवत इम्रान यांना निवडून देण्याची विनंती करतो,’ अशा शब्दांत त्यांनी मतदारांना इम्रान यांना मतदान करण्याचे आवाहन केले.