तिरुवअनंतपूरम - मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन नौदलाचे INS जलाश्व जहाज कोची बंदरात दाखल झाले आहे. ६९८ भारतीयांना घेऊन जहाज माघारी आले आहे. नौदलाने याबाबत माहिती दिली आहे. या प्रवासांमध्ये १९ गर्भवती महिला आहेत. भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी माघारी आणण्यासाठी 'ऑपरेशन समुद्र सेतू' सुरू केले आहे.
कोचीन पोर्ट ट्रस्टवर सर्व प्रवासी उतरले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे पोलीस महानिरिक्षक विजय साखरे यांनी सांगितले. या प्रवाशांमध्ये ४४० केरळमधील नागरिक असून इतर प्रवासी बाकी राज्यातील आहेत.
विविध राज्यातील प्रवाशांची संख्या
तामिळनाडू १८७ प्रवासी, तेलंगाणा ९ प्रवासी, आंध्र प्रदेश ८, कर्नाटक ८, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थानमधील प्रत्येकी ३ प्रवासी, गोवा १, आसामचा १ प्रवासी आहे. उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातील प्रत्येकी ७ प्रवासी आहेत. दिल्लीचे ४, तर पुदुच्चेरीचे ३ आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंडमधील प्रत्येकी दोन प्रवासी आहेत.
केरळ राज्य परिवहन बसद्वारे केरळमधील प्रवाशांना त्यांच्या घरी पोहचविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक बसमध्ये ३० प्रवासी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. इतर राज्यातील प्रवाशांना नेण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.