नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन'मुळे नागरिक घरातच राहत असून रस्त्यावर केवळ आवश्यक कामासाठी बाहेर निघणार्या व्यक्ती आहेत. शहरातील रस्ते पूर्णत: निर्जन झाले आहेत. याचा फायदा मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीला झाला आहे. नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असून ते पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध झाले आहे.
गेल्या 20 वर्षांपासून दररोज नर्मदा नदीत स्नान करीत आहे. लॉकडाऊनमुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. गेल्या 20 वर्षात अशा प्रकारचा बदल घडलेला मी पाहिला नाही. नर्मदा नदीचे पाणी शुद्ध व निर्मळ झाले आहे, असे 20 वर्षांपासून नर्मदा नदीत स्नान करणारे धार येथील सुधीर शर्मा यांनी सांगितले
लॉकडाऊनमुळे लोकांना नर्मदा नदीत स्नान करता येत नाही. त्याचबरोबर उद्योगांमधील नर्मदा नदीतील प्रदूषणही थांबले आहे. पाणी स्वच्छ झाले असून जलचर प्राणीही नदीत स्वच्छपणे तरंगताना पाहायला मिळत आहेत.
मध्य प्रदेशची जीवनरेखा असलेली नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधून वाहते. धार जिल्ह्यात नर्मदा नदी खलघाटमधून बारवानीकडे वाहते. धार जिल्ह्यातील खलघाट येथील नदीवरील पुलावरून नदीकडे पाहिल्यास भारताचा नकाशासारखा आकार असल्याचे दिसते. पाणी स्वच्छ झाल्यामुळे नदीच्या मध्यभागी नैसर्गिकरित्या बनलेल्या भारताच्या नकाशाचा आकार अधिक स्पष्टपणे दिसू लागला आहे. कदाचित लॉकडाउन झाले नसते तर नर्मदेचे असे विहंगम दृश्य दिसले नसते.