अहमदाबाद - लोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच आपली जन्मभूमी गुजरातला पोहोचले आहेत. अहमदाबाद विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावळी आयोजित सभेतून त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. यानंतर ते त्यांच्या आई हिराबेन यांचे आशिर्वाद घेण्यासाठी रवाना झाले.
२०१४ प्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने गुजरातमधील सर्व २६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यानिमित्त अहमदाबादजवळील खानापूर येथे मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. मोदींनी सर्वप्रथम सुरत आगीच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धाजंली वाहीली. ही घटना अत्यंत दुर्देवी असून त्या मुलांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे ते म्हणाले.
त्यांनंतर त्यांनी जनतेचे आभार मानले. आज मी ज्या पदावर आहे, त्यामागे गुजराती जनतेचे आशीर्वाद आहेत. गुजरातसह देशातील सव्वाशे कोटी जनातेचा विकास करणे माझे उद्दिष्ट आहे. सामान्य व्यक्तीने देशाबद्दल पाहिलेल्या स्वप्नापेक्षा जास्त उंचीवर देशाला नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हा विजय कोणत्याही पक्षाचा, कार्यकर्त्याचा, किंवा मोदीचा नसून तो देशातील जनतेचा विजय असल्याचे ते म्हणाले.
यानंतर मोदी गांधीनगर येथे जाणार असून त्यांच्या आईची ते भेट घेणार आहे. निवडणुकीदरम्यान मतदानासाठी गुजरातला आले असता त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली होती.