नवी दिल्ली - शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार २.० ची सुरुवात झाली आहे. आज मोदींनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक बोलावली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्यण घेण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदींनी आज कॅबिनेट बैठकीत पहिला निर्णय वीरमरण आलेल्या जवानांच्या मुलांसाठी घेतला. मोदींनी महत्वपूर्ण निर्यण घेताना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. आता मुलींनी दर महिन्याला २ हजार २५० ऐवजी ३ हजार तर, मुलांना २ हजारांऐवजी २ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी नक्षलवादी हल्यात वीरमरण आलेल्या राज्य पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. जवळपास ५०० कुटुबांना या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होणार आहे.
कृषीमंत्री नरेंद सिंह तोमर यांनी सांगितले, की पंतप्रधान शेतकरी योजनेत सर्व शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये सन्मान निधी मिळणार आहे.