मुंबई - आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी डबेवाले दोन दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे शहरात काम करणाऱ्या चाकरमान्यांना १२ आणि १३ जुलैला डबेवाल्यांची सेवा मिळू शकणार नाही.
पंढरपूर येथे डबेवाल्यांची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत डबेवाले वारकरी मुक्कामास येतात. येथे डबेवाल्यांची विनामूल्य राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी १५ जुलैपासून ही सेवा सुरळीतपणे चालू राहील, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे.
डबेवाले हे मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायातील असल्यामुळे आषाढी आणि कार्तिकी एकादशी या २ एकादशी त्यांच्यासाठी महत्वाच्या असतात. कार्तिकी एकादशीला ते आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला जातात. आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. त्यामुळे या दिवशी ते आवर्जून सुट्टी घेतात.