नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून तीन कृषी विधेयकांविरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विशेषत उत्तर भारतात आंदोलनाने जास्त जोर पकडला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीवरून (एमएसपी) आश्वस्त केले आहे. एमएसपी फक्त राहणारच नाहीत तर भविष्यात त्यात वाढ होत राहील, असे ते म्हणाले. राजधानी दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावरही हल्लाबोल केला. काँग्रेसच्या युवा आघाडीने राष्ट्रपती भवनाजवळ सोमवारी आंदोलन करत ट्रॅक्टर पेटवून दिला होता. त्यावरून सिंह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. 'जसे शस्त्र जवानांसाठी पवित्र असते, तसे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी पवित्र आहे. मात्र, काँग्रेसने ट्रॅक्टर पेटवून देत शेतकऱ्यांचा अपमान केला', असे सिंह म्हणाले.
'मी एक शेतकऱ्याच मुलगा आहे. जे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, ते मोदी सरकार कधीही करणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. चुकीची माहिती आणि पूर्वग्रह दूर करण्यासाठी मी काही शेतकरी संघटनांबरोबर चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मला शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचे आहे की, एमएसपी फक्त राहणार नाही, तर येत्या काही वर्षात ती वाढतच राहिल, असे ते म्हणाले. मी शेतकरी संघटनांना आवाहन करतो, की त्यांना जर काही अडचण असेल त्यांनी आमच्याशी येऊन बोलावे.