नवी दिल्ली - राजधानीमध्ये आजपासून सम- विषम क्रमांकाची वाहने चालवण्याबाबतची योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, भाजप खासदार विजय गोयल यांनी पहिल्याच दिवशी या योजनेला बेकार म्हणत नियमांचे उल्लंघन केले. आज सम क्रमांकाची वाहने चालवण्यास परवानगी असताना विषम क्रमांकाची चारचाकी गाडी घेवून ते बाहेर पडल्याने त्यांना दंड भरावा लागला आहे.
सम- विषम योजना चुकीची असून अनेक पर्यावरण संस्थानी याचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आमचा या योजनेला विरोध आहे. विरोध करण्यासाठी सम क्रमांकाच्या गाड्या चालवण्यास परवानगी असतानाही विषम क्रमांकाची गाडी घेऊन ते रस्त्यावर आले होते.
दिल्लीमध्ये वातावरणातील वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने गाड्यांची सम- विषम प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 'सम' तारखेला 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावतील तर, 'विषम' तारखेला 'विषम' क्रमांकाच्या गाड्या धावतील. आजपासून ही प्रणाली लागू झाली असून आज ४ तारीख असल्याने 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी राहील.