भोपाळ : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील घटना अद्याप ताजी असतानाच, मध्य प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. राज्याच्या खरगोन जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केला. त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला टाकून देत तिघे आरोपी फरार झाले.
खरगोना जिल्ह्याच्या मारुगढमध्ये ही घटना घडली. पीडिता आणि तिचा भाऊ रात्री शेतात राखण करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या झोपडीमध्ये मध्यरात्री तिघे जण आले. त्यांनी या दोघांना पाणी मागितले, पाणी पिल्यानंतर त्यांनी दारुही मागितली. दारु नसल्याचे पीडितेच्या भावाने सांगितल्यानंतर हे तिघे तिथून निघून गेले. त्यानंतर दहा मिनिटांनी परत येत त्यांनी पीडितेच्या भावाला मारहाण करुन, मुलीला उचलून नेले.
पीडितेचा भाऊ कसाबसा मदतीसाठी गावकऱ्यांना घेऊन परतला. तोपर्यंत या तिघांनी पीडितेवर अत्याचार करुन तिला रस्त्याच्या कडेला टाकून फरार झाले होते. या तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेंद्र सिंह यांनी दिली.
हेही वाचा : युपी पुन्हा हादरले...नशेचे इंजेक्शन देऊन सामूहिक आत्याचार ; पीडितेचा मृत्यू