नवी दिल्ली - लोकसभेत आज (गुरुवार) तिहेरी तलाक विधेयक ३०३ खासदारांच्या समर्थनानंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या विरोधात ८२ मते पडली. परंतु, विधेयकावर जवळपास ५ तासांची चर्चा रंगली. या चर्चेत खासदार असदुद्दीन ओवैसी, कनीमोझी, मुख्तार अब्बास नक्वी, पुनम महाजन, मिनाक्षी लेखी, रविशंकर प्रसाद यांनी विधेयकावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.
असदुद्दीन ओवैसी
ओवैसी म्हणाले, की इस्लाममध्ये ९ प्रकारचे तलाक आहेत. तिहेरी तलाक त्यापैकी एक आहे. परंतु, नवीन तिहेरी तलाक विधेयकामुळे महिलेवरती अन्याय होणार आहे. तलाक दिल्यानंतर पोलीस पतीला अटक करतील. पती म्हणेल मी एकदाच तलाक म्हटलो होतो. इस्लामनुसार, ३ महिन्यानंतर तलाक होईल. यामुळे तुम्ही पतीला पत्नीवर जुलुम करण्याची संधी देत आहात. हा कायदा मुस्लीमांच्या विरोधात आहे.
पुनम महाजन
आपण ज्या समाजात राहतो त्याप्रमाणे धर्म पुढे जायला पाहिजे. या काळात समाज बदलत आहे. भारत आणि जग पुढे जात आहे त्याप्रमाणे आपल्याही धर्मात बदल करायला पाहिजेत.
मुख्तार अब्बास नक्वी
तिहेरी तलाक कुप्रथा आणि सामाजिक निंदा आहे.
अपराजिता सारंगी
महिलांचा तिहेरी तलाकच्या नावाखाली होणारा छळ थांबवण्यासाठी आज चांगला दिवस आहे. धर्माच्या नावाखाली सुरू असलेली ही कुप्रथा बंद केली पाहिजे.
कनीमोझी
तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार इतके उत्सुक का आहे हे कळत नाही. तिहेरी तलाकशिवाय महिला सशक्तीकरणासाठी इतर अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. महिलांची खरोखरच काळजी असेल तर, ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक लवकरात लवकर मंजूर करा.
मिनाक्षी लेखी
महिला या देशातील सर्वात मोठा अल्पसंख्यांक वर्ग आहे. तुम्हाला स्त्री-पुरुष समानता हवी असेल. तर, सर्वांनी मिळून काम केले पाहिजे.
रवीशंकर प्रसाद
धर्म, पुजा, प्रार्थना किंवा मतदानाचा नाही हा महिलेचा न्याय आहे.