अहमदाबाद - आई आणि मुलांचे नाते हे अतुट असते. या नात्यांमध्ये कितीही कालावधीचा किंवा अंतराचा फरक असो नात्यातील ओलावा हा कायम टिकून असतो. गुजरातमधील शहापूर पोलिसांना नुकताच याचा प्रत्यय आला. मागील दहा वर्षे एकमेकांपासून दुर झालेल्या आंध्र प्रदेशातील माय-लेकराची शहापूर पोलिसांनी भेट घडवून आणली.
शुभलक्ष्मी उन्नत(वय-55) आणि सैदुलू उन्नत असे या माय-लेकांची नावे आहेत. दोघेही आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. 2006 मध्ये शुभलक्ष्मी यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्या मानसिक तणावामध्ये होत्या. याच दरम्यान एक दिवस त्या कुणालाही कल्पना न देता घरातून निघून गेल्या. त्यांच्या मुलाने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुप शोध घेऊनही शुभलक्ष्मी यांचा तपास लागला नाही. शेवटी मुलगा सैदुलू यांनी आईला मृत समजून त्यांचा हार घातलेला फोटाही घरामध्ये लावला.
हेही वाचा - पॉर्न साईटमुळेच देशात महिलांवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ - नितिश कुमार
ऑगस्ट महिन्यामध्ये शहापूरमधील काही नागरिकांना शुभलक्ष्मी रस्त्याच्याकडेला झोपलेल्या आढळल्या. नागरिकांनी शहापूर पोलीस आणि 'आश्रय गृह' या सामाजिक संस्थेला याबाबत माहिती दिली. दुभाषकाच्या मदतीने पोलिसांनी शुभलक्ष्मी यांच्या कुटुंबियांची माहिती मिळवली. आंध्र प्रदेश पोलिसांशी संपर्क करून शुभलक्ष्मी यांच्या मुलाला आईबद्दल माहिती दिली. यानंतर शुभलक्ष्मी यांचा मुलगा सैदुलू आपल्या आईला घरी परत आणण्यासाठी गुजरात येथे गेला.
दहा वर्षानंतर एकमेकांना भेटल्यानंतर आई आणि मुलगा दोघेही भावूक झाले. शहापूर पोलिसांनी शुभलक्ष्मी यांना कपडे आणि मिठाई देऊन निरोप दिला. शुभलक्ष्मींचा मुलगा सैदुलू उन्नन यांनी शहापूर पोलिसांचे आणि आश्रय गृह सामाजिक संस्थेचे आभार मानले.