नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालायाने एका आईला आपल्या तीन मुलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलण्याची परवानगी दिली आहे. कौटुंबिक वादामुळे पती पत्नी वेगवेगळे राहत असून तिन्ही मुले पतीजवळ आहेत. एक मुलगी दहा वर्ष, दुसरी सात वर्षांची तर तिसरी तीन वर्षांची आहे. या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्ती नाजीम वजीरी यांनी निकाल दिला.
तिन्ही मुलींचे वय कमी असून त्यांना आईची गरज आहे. मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी कोणत्याही अडचणीशिवाय मुलांना आईशी बोलू दिले पाहिजे. जर ते समोरासमोर बोलू आणि भेटू शकत नसतील तर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलू द्यावे, असे न्यायालयाने मत नोंदविले.
मुलांच्या खोलीत कॉम्प्यूटरची व्यवस्था करण्याचे आदेश
मुलांच्या खोलीत एका कॉम्प्यूटरची व्यवस्था करण्यात यावी. त्याद्वारे स्काईप किंवा इतर माध्यमातून मुलांना आईशी बोलता येईल. मुलांशी बोलताना पतीने खोलीत न थांबण्याचे आदेशही पतीने दिले आहेत. सुनावणीच्यावेळी पतीच्या वकिलांनी मुलांना आईशी बोलण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे न्यायालयाला आश्वासन दिले.