गांधीनगर(जूनागढ) - देशात उत्तम दर्जाचे आंबा उत्पादन महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात घेतले जाते. अनेक शेतकरी विविध प्रकारचे उत्पादन घेतात. यामध्ये आता गुजरातमधील एका शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. जुनागढच्या भलच्छेल गावात राहणाऱ्या एका प्रगतशील शेतकऱ्याने विदेशी प्रजातींच्या आंब्यांची लागवड केली आहे. समशुद्दीन भाई असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
समशुद्दीन भाई यांनी आपल्या शेतात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि ईस्त्रायल येथील आंब्यांच्या प्रजातींची लागवड केली आहे. गुजरातचे गीर आणि जूनागढ हे दोन जिल्हे प्रामुख्याने केशर आणि केशरी या जातींच्या आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, समशुद्दीन भाई यांनी विदेशी आंब्यांची लागवड करुन एक नवीन प्रयोग केला आहे.
जपानमध्ये पिकवला जाणारा आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा मानला जातो. हा आंबा भारतातील केशर आंब्याच्या चवीपेक्षा थोडा सरस असतो. समशुद्दीन भाई यांनी या जगातील सर्वात महागड्या आंब्याचीही आपल्या शेतात लागवड केली आहे.
भारताव्यतिरिक्त जगभरातील अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, ईस्त्रायल, फ्लोरिडा, थायलंड आणि इजिप्त या देशांमध्ये आंब्याचे उत्पादन घेतले जाते.