नवी दिल्ली - कुलूतील लाहोल-स्पीती जिल्ह्यासाठी अटल बोगदा वरदान ठरला आहे. काल रविवारी ५ हजार ४५० वाहने या बोगद्यातून गेली. उद्घाटनानंतर बोगद्यातून जाणारी ही सर्वाधिक वाहनांची संख्या होती. बोगदा सुरू झाल्यानंतर २८०० वाहने लाहोलकडे व २६५० वाहने रोहतांगहून मनालीकडे वळली आहेत.
बोगद्यात -१८ डिग्री तापमान -
खास बाब म्हणजे बोगद्यात उणे १८ अंश तापमान असूनही पोलीस कर्मचारी बोगद्याची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था हाताळण्यास तयार आहेत. हा अटल बोगदा आता पर्यटनाचेही प्रमुख केंद्र बनला आहे. मनालीचे दर्शन घेत पर्यटक अटल बोगद्यामार्गे लाहोलला जात आहेत.
३० चालकांना दंड -
मनालीच्या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे. सोलंगनाला ते अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टल दरम्यान ट्रॅफिक होत आहे. अनेक वाहनचालकही नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आत्तापर्यंत ३० वाहनचालकांना दंड आकारला आहे.
नॉर्थ पोर्टलवर सामान्य रहदारी -
या बोगद्यातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी जवान तैनात केले आहेत. वाहनांची संख्या वाढूनही नॉर्थ पोर्टलवर सामान्य रहदारी असल्याचे लाहोल-स्पीतीचे एसपी मानव वर्मा यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी पार्किंगसाठी जागा चिन्हांकित केली गेली आहे.
अतिरिक्त पोलीस दल तैनात -
देशासह राज्यासाठीही अटल बोगदा महत्त्वपूर्ण आहे. दिवस-रात्र पोलीस कर्मचारी तैनात करून याची सुरक्षा केली जात आहे. वाहनांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस दलांनाही तैनात करण्यास सांगितले आहे.