नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून देशांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे. सध्या प्रत्येक सहा तरुणांमागे एकाहून अधिक जण बेरोजगार होत आहेत. याशिवाय जे काम करत आहेत त्यांच्या कामाच्या तासात 23 टक्के कपात केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) हा अहवाल मांडला आहे.
आयएलओच्या कोविड 19 अॅण्ड वर्ल्ड ऑफ वर्कची चौथी एडिशन बुधवारी प्रकाशित झाली. झिनहुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारीपासून तरुणांच्या बेरोजगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याचा तरुण पुरुषांपेक्षा स्त्रियांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.
कोरोनामुळे तरुणांना तीन समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरुणांना केवळ नोकरी सोडावी लागत नाही, तर याचा शिक्षण आणि ट्रेनिंगवरही परिणाम झाला आहे. सोबतच नव्याने मार्केटमध्ये येणाऱ्या तरुणांनाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
2019 मधील तरुण बेरोजगारीचा दर 13.6 म्हणजेच इतर कोणत्याही गटापेक्षा अगोदरच जास्त होता. जगभरात जवळपास 267 मिलियन तरुण रोजगार, शिक्षण किंवा प्रशिक्षण घेत नव्हते. या सर्व परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना आयएलओचे महासंचालक गाय रायडर यांनी सांगितले, की परिस्थिती सुधारण्यासाठी लक्षणीय आणि त्वरित उपाय शोधण्याची गरज आहे. असे न झाल्यास कोरोनाचा परिणाम अनेक दशकांपर्यंत तरुणांच्या रोजगारावर होत राहिल.