नवी दिल्ली - नैऋत्य मॉन्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 15 मे च्या तारखेच्या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन झाल्यानंतर 5 जूनला दक्षिणेकडील राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
31 मे रोजी दक्षिण-पूर्वेकडील आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून लवकर केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 48 तासात मालदीव-कोमोरिन क्षेत्राच्या आणखी काही भागातून मान्सून पुढे जाण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मान्सूनची पहिली सुरुवात बंगालच्या उपसागरावरील अम्फान चक्रीवादळामुळे झाली. चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रकिया वेगाने झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यावर्षी देशामध्ये साधारण पाऊस पडले, असेही विभागाने म्हटले आहे. दरम्यान गेल्या वर्षी हवामान विभागाने 6 जूनला नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल, असा अंदाज दिला होता. प्रत्यक्षात 8 जून रोजी झालं होतं.
भारतात केरळच्या किनारपट्टीला धडकून मान्सून दाखल होतो. त्यानंतर तो देशभर आगेकूच करतो. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर पुढील सरासरी सात दिवसात तो महाराष्ट्रात दाखल होतो. दरवर्षी सामान्यपणे १ जूनला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असते.