नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्ली मागील ३ दिवसांपासून धगधगत आहे. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावर पक्षांकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिल्लीमधील परिस्थितीने 2002 च्या गुजरात दंगलीची आठवण करुन दिली असून या परिस्थितीला अमित शाह जबाबदार आहेत, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले.
2002 मध्ये गुजरातमध्ये दंगल झाली होती. आताचे भारताचे पंतप्रधान तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसेच अमित शाहदेखील गुजरात सरकारमध्ये होते. अमित शाह आणि मोदी दिल्लीमध्ये गुजरातसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे येचूरी म्हणाले.
नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन गट एकमेकांसमोर आल्याने २३ तारखेपासून दिल्लीत हिंसाचार पसरला आहे. यामध्ये एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांवर एफआयआर दाखल केले असून 106 लोकांना अटक केली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.