नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखस्थानी 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ'( सीडीएस) पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. तिन्ही सेनादलांमध्ये समन्वय सधण्यासाठी सीडीएसचे पद निर्माण केले आहे. बदलत्या जगामध्ये भारताने छोट्या छोट्या तुकड्य़ांमध्ये विचार करुन चालणार नाही, असे मोदी म्हणाले. संरक्षण दलांमध्ये सुधारणा करण्याची मागणी अनेक दिवसांची होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
सैन्य दलाला बळकटी आणण्यासाठी सीडीएस पद निर्माण करण्यात आले आहे. सैन्याने सर्व शक्तीनिशी एकत्र येण्याची गरज आहे. या पदामुळे सैन्याला प्रभावी नेतृत्त्व मिळेल, असे मोदी म्हणाले.
लष्कराच्या तिन्ही सेनादल पदी 'चीफ ऑफ स्टाफ'ची नियुक्ती करण्यात येते. सर्वात वरिष्ठ सदस्याला यापदी नियुक्त करण्यात येते. आता या तिन्ही प्रमुखांच्या वरती सीडीएस नेतृत्त्व करतील. अनेक दिवसांपासून हे पद निर्माण करण्याची मागणी करण्यात येत होती. २०१२ मध्ये नरेश चंद्र समितीने चीफ ऑफ डिफेन्स पद निर्माण करण्याचे सुचवले होते.
यावेळी बोलताना मोदींनी दहशतवादावर भाष्य केले. दहशतवाद पसरवणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारताचे प्रयत्न चालूच राहतील. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना जगापुढे उघडं पाडू. शेजारील देशांनाही दहशतवादाने घेरलं आहे, असे मोदी म्हणाले. जल, थल, नभ तिन्हीमध्ये लष्कर प्रगतशिल करण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.