नवी दिल्ली – सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सामर्थ्यवान असल्याची बनावट प्रतिमा तयार केली. आता, त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य ही देशाची सर्वात मोठी दुर्बलता झाल्याचा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. पूर्व लडाखमध्ये सीमारेषेवर चीनबरोबर तणावाची स्थिती असल्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
राहुल गांधींनी समाज माध्यमात प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमधून मोदी सरकाच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की चीनबरोबर असलेला वाद म्हणजे साधा सीमारेषा वाद नाही. चिनी आज आपल्या प्रदेशात बसले आहेत, याची मला चिंता वाटते. कोणत्याही रणनीतीशिवाय चिनी लोक हे काहीही करत नाहीत. ते जगाच्या नकाशाची पुनर्रचना करण्याचा विचार करत आहेत. आज ग्वादार, वन बेल्ट आणि रोड योजना काय आहे? ते ग्रहाची (पृथ्वीची) पुनर्रचना करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही चिनी लोकांचा विचार करत असाल तर तुम्ही समजून घेतले पाहिजे.
राहुल गांधींनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. परराष्ट्र धोरण, भारतीय अर्थव्यवस्था व इतर राष्ट्रांबरोबर असलेले संबंध विस्कळित असताना चीनने आपल्या प्रदेशात घुसखोरी केली आहे, याकडे गांधींनी लक्ष वेधले आहे.