रांची - तरबेज अन्सारी प्रकरण चर्चेत असतानाच झारखंडमध्ये मॉबलिंचिंगची आणखी एक घटना घडली आहे. गोमांसाच्या विक्रीच्या संशयातुन संतप्त जमावाने तीन जणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुंटीतील कर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली. मॉबलिंचिंग प्रकरणातील जखमींना तत्काळ रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातत आले होते. तिघांपैकी, लापंग येथील रहिवासी क्लेंटस बार्ला यांचे रीम्समध्येच निधन झाले आहे. जखमी झालेल्यांमध्ये लता महुवाटोली येथाल रहिवासी फागु कछप आणि जलदंता सुवारी येथील रहिवासी फिलिप होरो यांचा समावेश आहे.
हेही वाचा - अल कायदाचा दहशतवादी मोहम्मद कालिमुद्दीन एटीएसच्या ताब्यात
या घटनेनंतर कर्रा पोलीस ठाणे परिसरासह आजूबाजूच्या भागात तणावपूर्ण परिस्थिती आहे. दक्षिण छोटानागपूर परिसराचे डीआयजी अमोल वेणुकांत होमकर, जिल्हा उपायुक्त सूरज कुमार, प्रभारी एसपी आशुतोष शेखर यांच्यासह कर्रा पोलीस ठाण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची या प्रकरणाबाबत बैठक पार पडली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी परिसरात तौनात आहेत.