पाटणा - देशभरात विविध भागात मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. बिहारमध्ये पुन्हा एकदा मुले चोरीच्या संशयावरून एका युवकाची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 23 जणांना अटक केली आहे.
जमावाच्या मारहाणीत अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे. नौबतपूर ठाण्याच्या हद्दीतील महमदपूरमध्ये एका युवकाची लहान मुले चोरल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी महमदपूर भागात लहान मुले चोरी होण्याची अफवा पसरली. दरम्यान त्या भागातून एका अनोळखी व्यक्तीला जात होता. मुले चोरी करण्याच्या उद्देशाने तो फिरत असल्याच्या संशयावरुन जमावाने मारहाण करत त्याची हत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी युवकाला जमावाच्या तावडीतून सोडवत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृताची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
यापूर्वी बिहारमधील रुपसपूर मधील खगौल नहर रोड येथे मॉब लिंचिंगची घटना घडली होती. मुले चोरीच्या संशयावरून जमावाने तीन जणांना मारहाण केली होती. यामध्ये त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 32 जणांना अटक केली होती.