नवी दिल्ली - देशात लॉकडाऊन सुरू आहे. घरातच राहण्याचा सूचना शासन, प्रशासन करत असतानाही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेवर ताण पडत आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याची समज देण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर जमावाने दगडफेक केली आहे. उत्तर प्रदेशमधील बहराईच येथे ही घटना घडली.
पोलीस कोरोना संशयिताला घेऊन जात असताना त्यांना मांसाच्या दुकानात मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा पोलिसांनी प्रत्येकाला त्यांच्या घरी जाण्यास सांगितले. मात्र, दुकानदाराने पत्नी, भाऊ व मुलांसह पोलीस पथकावर हल्ला केला. दरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
यापूर्वीही उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांवर हल्ला झाले होते. मध्य प्रदेशातही इंदूर व अन्य भागांत पोलीस व डॉक्टरांवर हल्ले झाले, ज्यात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे.
सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.