नालंदा - जिल्ह्यातील मायापूर येथील मिताली प्रसाद हिने दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतश्रृंखलेतील सर्वात उंच पर्वत आकोंकागुआ सर करुन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली मिताली लहानपणापासूनच धाडसी स्वभावाची आहे. मिताली कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. जगातील सर्वात उंच सात पर्वतांवर चढाई करण्याचे तिचे स्वप्न होते. तिने आत्तापर्यंत कांचनजंघा, टायगर हिल्स आणि किलिमंजारो पर्वताचे शिखर सर केले आहे. मात्र, यशाचा स्वाद चाखन्याआधी अनेक कठिण प्रसंग आणि वाटचालींना सामोरे जावे लागते. मितालीलादेखील अशाच प्रकारे अनेक प्रसंगांना समोर जावे लागले. आकोंकागुआ पर्वत चढताना तिच्या बोटांमध्ये जळजळ व्हायला लागली. हे तिथल्या वातावरणातील बदलामुळे होत असून याला फ्रॉस्ट व्हाईट असे म्हणतात. तिची बोटं आधी निळी पडली आणि नंतर त्याचा रंग काळवंडला. यानंतर तिसऱ्या टप्प्यात तिला शस्त्रक्रियेद्वारे बोटं कापावी लागली. मात्र, तरीही तिने आपले स्वप्न पूर्ण करण्याचे ठानले असून तिला पुढे माऊंट एव्हरेस्ट सर करायचे आहे.
मिताली सोलो स्टेजमध्ये माऊंट आकोंकागुआ सर करणारी पहिली भारतीय महिला आहे. यासाठी तुमची तयारी असण्यासोबतच तितकी मेहनत आणि जिद्द असावी लागते, असे मिताली सांगते. जीवनात काहीतरी हटके करून दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या अनेक मुलींसाठी आज मिताली प्रेरणा ठरत आहे.