हैदराबाद - कोरोना संशयित रुग्ण शहरातील गांधी रुग्णालयातून बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात सापडला आहे. भरती करण्यात आल्यानंतर रुग्ण बेपत्ता झाला होता. नुकतेच मृतदेहांच्या हेळसांडीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर हैदराबाद शहरात वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी रूग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर नरेंद्र सिंग (39) नामक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार 6 जूनला दाखल करण्यात आली होती. 31 जूनला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि ताप येत असल्याने रुग्णाला गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही तपास सुरू केला होता. गांधी रुग्णालयात उपचार घेण्याआधी नरेंद्र सिंगवर उस्मानिया आणि किंग कोटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. 31 मे ला रात्री 10.30 ला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, नरेंद्र सिंग यांचा मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असल्याचा आणि त्यांचे वय 65 असल्याची नोंद रुग्णालयात केली गेली होती, असे मंगलहाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणवीर रेड्डी यांनी सांगितले.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सिंग यांच्या कुटुंबीयांना 19 जूनला रुग्णालयात बोलावले. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर कुटुंबीयांच्या हाती मृतदेह सोपविण्यात आला, असे रेड्डी यांनी सांगितले. सिंग यांच्या कुटुंबियांनी निष्काळजीपणाचा आरोप गांधी रुग्णालयावर केला आहे.