पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांनी पाटलीपुत्र लोकसभा मतदार संघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना पहिल्यांदाच लालू प्रसाद यादव त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे वडील उपस्थित नसल्याने मीसा भारती यांनी त्यांचा फोटो सोबत आणला होता. यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
लालू प्रसाद यादव चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगवास भोगत आहे. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्याने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ते झारखंडच्या रिम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात त्यांची कमतरता जाणवत आहे. असे पहिल्यांदाच होत आहे, की लालू प्रसाद यादव निवडणूकांपासून दूर आहेत.
आज त्यांच्या पुत्री मीसा भारती यांनी पाटलीपुत्र मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत त्यांची आई राबडी देवीही यावेळी उपस्थित होत्या. मात्र, आपले वडील सोबत नसल्याने त्या लालू प्रसाद यादव यांचा फोटो घेऊन जिल्हाधीकारी कार्यालयात दाखल झाल्या. पहिल्यांदाच वडिलांशिवाय मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जात आहे, असे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
काही दिवसांपूर्वी राबडी देवी यांचा एक ऑडिओ टेप समोर आला होता. त्यामध्ये त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. लालू प्रसाद यादव यांना कुटुंबीयांशी भेटू दिले जात नाही. त्यांना मोदी सरकार विष देऊन मारून टाकेल, असे राबडी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारचे राजकारण तापले होते. लालू प्रसादांचे कुटुंब राजकारणासाठी लालूंचा असा फायदा घेत आहेत, असे विरोधकांचे म्हणणे आहे.