हैदराबाद : बलात्कारास विरोध केल्यामुळे एका १३ वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकत, तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना तेलंगाणाच्या खम्माममध्ये समोर आली आहे. शहराच्या मुश्तफानगर परिसरात ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तफानगर येथील एका घरात ही मुलगी घरकाम करत होती. रोजच्याप्रमाणे कामावर गेली असता, घरमालकाच्या मुलाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केल्यावर चिडून त्याने तिच्यावर पेट्रोल टाकत तिला पेटवले. यानंतर, आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला गुपचूप एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना १७ दिवसांपूर्वी घडली. सोमवारी जेव्हा तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा ही घटना उजेडात आली.
यानंतर अतिरिक्त पोलीस उपायुक्त पूजा, सहाय्यक पोलीस आयुक्त अंजनैलू यांनी पीडितेची भेट घेत तिची चौकशी केली. तसेच, त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचीही विचारपूस केली. यानंतर तिला खम्माम सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मुलीला दवाखान्यात दाखल केले होते, तेव्हा तिची परिस्थिती गंभीर होती, त्यामुळे तक्रारीअगोदर तिच्याकडे लक्ष देणे गरजेचे होते असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ही मुलगी ७० टक्के भाजली गेली होती.
विशेष म्हणजे, एवढ्या प्रमाणात भाजली गेली असूनही, खासगी रुग्णालयाच्या प्रशासनाने पोलिसांना याबाबत कळवले नाही. खासगी रुग्णालयाने असा हलगर्जीपणा का दाखवला याबाबत आता चर्चा होते आहे. सध्या या मुलीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरमालकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.