जम्मू - भारत-पाकिस्तान क्रिकेट संघांत विश्वचषक सामना सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्यदलाने शस्त्रसंधीचा भंग करणे सुरुच ठेवले आहे. पाकिस्तानच्या रेंजर्सने पूंछ येथील सीमारेषेनजीक गावात गोळीबार केला. या गोळीबारात अल्पवयीन मुलीसह तीन नागरिक जखमी झाले आहेत. ही गोळीबाराची घटना रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पाकिस्तान सैनिकांनी गोळीबार सुरू केल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे सैन्यदलाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. कानोटे गावाजवळील मर्य्यम बी ही अल्पवयीन मुलगी जखमी झाली आहे. तर शहापुरजवळील रझिया आणि अकबर हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
पाकिस्तानच्या रेंजर्सनी मंगळवारीही शस्त्रसंधीचा भंग करत आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील तपास नाक्यांना लक्ष्य केले होते. हा तपासनाका हा कठुआ जिल्ह्यातील हिरानगर क्षेत्रात आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या गोळीबारानंतर त्यांना त्वरीत प्रत्युत्तर दिले.