श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने दहशतवादी संघटनेत नव्यानेच भरती झालेल्या एका दहशतवाद्यास अटक केली आहे. बडगाम जिल्ह्यातील चांदोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला अटक केली.
लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी आज (शुक्रवार) सकाळी सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर अचानक हल्ला केला. त्यानंतर पोलीस आणि लष्कराने चांदोरा परिसराला वेढा घालत दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका दहशतवाद्याला एके -४७ बंदुकीसह सापडण्यात आले, असे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.
जहांगीर अहमद भट असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो ३ दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. गोळीबार सुरू असतानाही दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलांना यश आले. ७ ऑक्टोबरला दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. जिल्ह्याच्या सगुन भागामध्ये सुरक्षा दलांनी ही कारवाई केली होती.