हैदराबाद - जवळपास 1 हजार परप्रांतीय कामगार सोमवारी नामपल्ली आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाकडे गावी परतण्यासाठी निघाले होते. बहादूरपुरा पोलिसांच्या हे निदर्शनास आल्यानंतर या सर्वांना ताब्यात घेऊन एका कार्यक्रम हॉलमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून काही बस मागवून या सर्वांना हॉलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
सोमवारी संध्याकाळी आरजीआय विमानतळाजवळील एल अँड टी कंपनीत काम करणारे सुमारे एक हजार परप्रांतीय मजूर नामपल्ली आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसले. त्यांना बहादूरपुरा भागातील प्राणी संग्रहालयाजवळ थांबविण्यात आले. आम्ही त्यांना समजावून सांगितले की, सध्या रेल्वे स्थानकांवर गाड्या उपलब्ध नाहीत, तुम्हाला जाता येणार नाही, असे अॅडल सीपी वाहतूक पोलीस अनिल कुमार यांनी माहिती दिली.
आम्ही वाहने बोलावून त्यांना एका हॉलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. शिवाय त्यांच्या खाण्या-पिण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तेलंगणा सरकार येत्या दोन दिवसात त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवेल, असे आम्ही त्यांना आश्वासन दिले आहे. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेत माघारी फिरण्यास ते सर्व तयार झाले, असेही कुमार यांनी सांगितले.