नवी दिल्ली - दिल्ली येथील अमर कॉलनी ठाण्याच्या हद्दीमधील गव्हर्नमेंट गर्ल्स सिनिअर सेकेंडरी स्कूल श्रीनिवासपुरी येथे शेल्टर होम तयार करण्यात आले आहे. याठिकाणी प्रवासी मजुरांना ठेवण्यात आले आहे. त्यांनी स्वेच्छेने या शेल्टर होमची रंगरंगोटी केलेली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे परराज्यातील मजूर आपआपल्या घरी जाण्यासाठी प्रवास करत आहेत. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना ठिकठिकाणाहून ताब्यात घेतले जात आहे. अशा प्रवासी मजुरांना ठेवण्यासाठी दिल्लीमध्ये शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. श्रीनिवासीपुरी येथील शेल्टर होममध्ये मजुरांची जेवणाची व्यवस्था चांगली होत असल्याने त्यांनी शाळेचा जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव पोलिसांसमोर मांडला. त्यानंतर मजुरांच्या भावनांचा सन्मान करत पोलिसांनी त्यांना साफ-सफाई आणि रंग-रंगोटी करण्याचे काम दिले. मजुरांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शाळेच्या भिंतींची रंगोरंगोटी केली आहे.