नवी दिल्ली - कोरोना विषाणू महामारीमध्ये दिल्लीत स्थलांतरित मजुरांबरोबर अमानुष वर्तनाची घटना उघडकीस आली आहे. दक्षिण दिल्लीमध्ये आरोग्य तपासणीसाठी लाजपत नगरमधील एका शाळेबाहेर थांबलेल्या प्रवासी मजुरांवर जंतुनाशक फवारल्याची घटना समोर आली आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने (एसडीएमसी) माफी मागितली आहे. हा प्रकार चुकून झाला आहे. कर्मचारी जंतुनाशक फवारणाऱया मशीनचा दबाव हाताळू शकले नाहीत. त्यामुळे जंतुनाशक फवारणीची दिशा बदलली, असे स्पष्टीकरण दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने दिले आहे.
श्रमिक स्पेशल रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी लाजपत नगर-3 मध्ये स्क्रिनिंगसाठी लाखो परप्रांतीय हेमू कलानी वरिष्ठ माध्यमिक शाळेबाहेर जमले होते. तेव्हा ही घटना घडली. दरम्यान कर्मचार्यांना भविष्यात जंतुनाशाक फवारणी करताना अधिक सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी मजुरांप्रती दिलगिरी व्यक्त केली.