तिरुवअनंतपुरम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. याचा सर्वात मोठा फटका परराज्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना दिला आहे.
यातच केरळमधील एक घटना समोर आली आहे. केरळच्या कन्नूरमध्ये बांधकाम करणाऱ्या मजुरांना, कर्नाटकच्या बीजापूरमधील आपल्या गावापर्यंत चालत जावे लागले आहे. केरळमधून निघालेले हे मजूर कर्नाटकमध्ये पोहोचल्यानंतर ही घटना प्रकाशात आली. विशेष म्हणजे या आठ मजुरांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या घोषणेनंतर हे मजूर ज्या ठिकाणी काम करत होते, त्या मुकादमाने त्यांना घरी जाण्यास सांगितले. यावेळी ना त्यांच्या मुकादमाने त्यांची काही मदत केली, ना कोणा सरकारी विभागाने. त्यामुळे कन्नूर ते बीजापूर हे सुमारे १४२ किलोमीटर अंतर या मजूरांनी पायीच कापले.
या घटनेची माहिती मिळताच आता संबंधित मुकादमावर कारवाई करण्याची मागणी लोकांमधून केली जात आहे. या मुकादमाने त्या मजूरांच्या राहण्याची किंवा त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करायला हवी होती, असे लोकांचे मत आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
हेही वाचा : रेल्वे सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही; रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण..