चंदिगढ - लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित मजुरांनी पायीच गावी जाण्यासाठी रस्ता धरला आहे. पोलिसांना चुकवत रस्त्याच्या बाजूने तर कधी रेल्वे रुळावरून मजुरांचा प्रवास सुरूच आहे. जीवघेण्या प्रवासात मजुरांचा जीवही जात आहे. महाराष्ट्रात रेल्वेने १६ मजुरांना चिरडल्याची घटना ताजी असताना अंबाला शहरात गाडीने धडक दिल्याने एका मजूराचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात एका मजूराचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याला चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हरियाणातून निघाले होते बिहारला
जवळील पैसे संपल्यामुळे मजुरांनी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. अंबाला शहरात काही काम मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे सर्वजण पायीच निघाले होते. मात्र, रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. लॉकडाऊनमुळे आधीच लाखो मजुरांचा रोजगार गेला आहे. सर्वात जास्त लॉकडाऊनमध्ये मजूर भरडले जात आहेत.