नवी दिल्ली - अमेरिकेत स्थाईक असलेले भारतीय शेफ विकास खन्ना लॉकडाऊनमुळे होरपळणाऱ्या स्थलांतरीत मजुरांसह गरजूंना अन्न पुरवण्याचे काम करत आहेत. आत्तापर्यंत 125 शहरांमध्ये 90 लाख लोकांना त्यांनी अन्न पुरविले आहे. सोशल मीडियाच्या मदतीने त्यांनी किराणा दुकानदार आणि ट्रक चालकांचे एक मोठे जाळे तयार करत गरीब आणि गरजूंना शिजवलेले अन्न आणि किराणा माल देण्याचे काम सुरू केले आहे. शेफ खन्ना यांच्या सहकार्याने उद्या(बुधवार) दिल्लीत 20 लाख लोकांना अन्न पुरविण्यात येणार आहे.
विकास खन्ना हे मुळचे पंजाबमधील अमृतसर येथील आहेत. ते प्रसिद्ध शेफ असून प्रतिष्ठेचा मिशलिन स्टार शेफ हा बहुमान त्यांना मिळाला आहे. मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून ते राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि मुंबईतील माक्झिमस कोलोबज या कंपनीबरोबर मिळून काम करत आहेत. देशातील 125 शहरांमध्ये 90 लाख लोकांना त्यांनी अन्न पुरवले आहे. वाराणसी, बंगळुरू, मंगळुरू, कोलकाता आणि मुंबई सारख्या छोट्या- मोठ्या 125 शहरात त्यांनी गरिबांना अन्न पुरविले आहे.
दिल्लीत जगातील सर्वात मोठा 'फूड ड्राईव्ह'
विकास खन्ना राजधानी दिल्ली आणि प्रदेशातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी बुधवारी सर्वात मोठा अन्न वाटपाचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. या मदत कार्यक्रमाला 'बरकत' असे नाव देण्यात आले आहे. जगातील हा सर्वात मोठा अन्न वाटपाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच दिवसात 20 लाख गरजूंना अन्नवाटप करण्यात येणार आहे.
न थकता आम्ही अपंग, एचआयव्हीबाधित, अनाथ व्यक्ती, वृद्धाश्रम, कुष्ठरोगी, ट्रान्सजेंडर या गरजूंना मदत करणार आहोत. त्यांनी आईवडिलांना सोडून दिले आहे, अशा व्यक्तींपर्यंतही आम्ही पोहोचणार आहोत, असे खन्ना यांनी सांगितले.